सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती संयुक्तरीत्या ४थ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन २२ ते २४ डिसेंबर दरम्यान बारामती येथे करीत आहेत. २८व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा विजयपूर (कर्नाटक) येथे होत असून या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामधील सायकलपट्टूंची निवड सुद्धा या राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमधून करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धा ९ ते १३ जानेवारी २०२४ दरम्यान होत असून इंडियन ऑईल हे या स्पर्धेचे सहप्रायोजक असणार आहे.
ही राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा युथ मुले व मुली (१२ ते १४ वर्षे वयोगट), सब ज्युनिअर मुले व मुली (१५ आणि १६ वर्षे वयोगट), ज्युनिअर मुले व मुली (१७ आणि १८ वर्षे वयोगट), ईलीट पुरुष व महिला (१९ वर्ष आणि त्यापुढील वयोगट) आणि २३ वर्षाखालील पुरुष (मेन अंडर२३ वयोगट) अशा एकूण नऊ वयोगटात होतील. इंडीव्युजल टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट / रोड रेस अशा दोन प्रकारात होणा-या या स्पर्धेसाठी पुरुष-महिला आणि मुले-मुली मिळून एकूण १७४ सायकलपट्टूंनी नांव नोंदवले आहे.
आंतरराष्ट्रीय पदकविजेती सायकलपट्टू कोल्हापूरची पूजा दानोले ही या स्पर्धेचे आकर्षन असून राष्ट्रीय पदक विजेती व एमटीबी सायकलिंग मधील आंतरराष्ट्रीय पदक विजेती, नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाची प्रणिता सोमन, नाशिकची ऋतिका गायकवाड, कोल्हापूरची रंजीता घोरपडे, बारामतीची राधीका दराडे, नवी मुंबईची स्नेहल माळी, पुणे क्रीडा प्रबोधिनीची आदिती डोंगरे, जळगांवची आकांक्षा म्हेत्रे यांच्यासह पुरुषामध्ये राष्ट्रीय पदक विजेता पिंपरी चिंचवडचा सुर्या थात्तु, पुण्याचा अदीप वाघ, प्रणव कांबळे, मुंबई शहरचा विवान सप्रु, नागपुरचा तेजस धांडे यांनी या स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला आहे.
बारामती येथे नव्यानेच तयार झालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर डायमेक्स कंपनी शेजारुन लिमटेक गावाच्या दिशेला जाणा-या सुमारे ७ किमी अंतारच्या मार्गावर या स्पर्धा होणार आहेत. या राज्य आणि राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमधून खेळाडू नोक-यांसाठी पात्र ठरत असतात, शासनाच्या इतर सर्व सवलती केवळ या स्पर्धेमधील कामगिरीवरुनच सायकलपट्टूंना मिळत असतात, नोक-या असणा-या खेळाडूंना बढती / पगारवाढ या स्पर्धेमधील कामगिरीवरुन ठरत असते म्हणून सायकलपट्टूंच्या दृष्टीने या स्पर्धा अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
या स्पर्धेचे स्पर्धा संचालक (Competition Director) आहेत तर मुख्यपंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच नवी मुंबईचे सुदाम रोकडे, काम पहणार आहेत तर दिपाली पाटील, धरमेंदर लांबा, उत्तम नाळे, मिलींद झोडगे, साईनाथ थोरात इत्यादी वेळ व्यवस्थापन/निर्णय पंच, पंच आणि पायलेट म्हणून काम पाहणार आहेत.
Comentários